Pages

Wednesday 29 December 2021

श्यामची आई ... ऑनलाइन संस्कार वाचन माला परिक्षा 2021-22

 पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई या संस्थेच्या वतीने श्यामची आई या पुस्तकावर आधारित संस्कार वाचन माला परिक्षा घेण्यात आली.

दि 24 ते 27 डिसेंबर 2021 या चार दिवसात महाराष्ट्रातील 2032 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याची पूर्वतयारी म्हणून प्रमुख कार्यवाह श्री श्यामराव कराळे यांनी कथन केलेल्या 42 कथा ची YouTube लिंक सर्वत्र पाठवली होती.

या परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळाला. साने गुरुजी आणि श्यामची आई या दोघांविषयी विद्यार्थ्याना असलेले प्रेम, आत्मीयता आणि उत्सुकता ही यातून दिसून येते.

सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षक, पालक यांना सुंदर असे ऑनलाइन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमास मार्गदर्शन करणारे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष श्री लालासाहेब पाटील आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासुन आभार.

Wednesday 23 December 2020

"करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे"


 

मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र गाणारे पूज्य साने गुरुजी यांनी आपल्या बालपणी मिळालेला संस्कारांचा ठेवा आजही आपल्यासाठी  "श्यामची आई" या पुस्तकात जपून ठेवून आपल्यासाठी वाटप केला आहे. त्यांच्या या पुस्तकातून प्रत्येक मानवाला जगण्याची प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे बालकांना संस्कारमय जीवन जगण्याची ऊर्मी येते.
पुण्यात एकदा साने गुरुजींची सभा होती सभेला अनेक कार्यकर्ते जमले होते.सभा ऐकण्यासाठी श्रोतृवर्ग व्याकुळ झाला होता. गुरुजी आपल्या घरापासून सभेला जाण्यासाठी निघाले. जाताना वाटेत काही मुले भेटली. भेटलेल्या मुलांनी गुरुजींना गोष्ट सांगण्याचा आग्रह केला. त्यांचा हात धरून ही छोटी छोटी बालके गोष्ट ऐकण्यासाठी त्यांना विनवणी करत होती. गुरुजींना त्यांची विनंती टाळून पुढे जाणे अशक्य झाले. शेजारीच गणपतीचे मंदिर होते या मंदिरात मुलांनी गोष्ट ऐकण्यासाठी बैठक मांडली. गुरुजींनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट  ऐकताना व्यत्यय येऊ नये, म्हणून एक मुलगा मंदिराच्या घंटे जवळ उभा राहिला आणि येणाऱ्या भाविकांना नमस्कार करून विनंती करायचा की कृपया घंटा वाजू नका. गोष्ट रंगू  लागली. इकडे सभेला उशीर होत होता. कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. एक कार्यकर्ता त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला. वाटेत त्याने पाहिलं की गुरुजी मंदिरात मुलांना गोष्ट सांगत आहेत. तो तेथे जाऊन थांबला आणि ती गोष्ट ऐकण्यात तोही  गुंग होऊन गेला. बराच वेळ झाला नंतर गुरुजींच्या लक्षात आलं की आपल्याला सभेला जायला उशीर होतो. त्यांनी गोष्ट आवरती घेऊन सभेकडे प्रस्थान केले. असे होते  साने गुरुजी. 
मुलांच्या आनंदात आनंद मानणारे साने गुरुजी म्हणजे मातृहृदय आणि पितृहृदय यांचा संगम असलेले व्यक्तिमत्व होते. मातेच्या हळुवारपणे त्यांनी आपल्या निकटतम सहकाऱ्यांना बोध अमृत पाजले. तर पित्याच्या कठोर वाणीने परकीयांशी झुंज दिली. शिक्षकी पेशा सोडून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्व झोकून दिले. जवळपास सात वर्ष वेगवेगळ्या कालावधीमध्ये तुरुंगवास सोसला. आपल्या लेखणीने समाजाला ज्ञानामृत पाजले अश्रु केवळ दुःख करण्यासाठी नाहीत तर हृदय स्वच्छ ठेवण्यासाठी असतात, हे त्यांनी दाखवून दिले. केवळ स्वातंत्र्याचा लढा नव्हे तर शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते दीनदलितांना त्यांचा लाडका विठुराया भेटावा यासाठी पंढरपूर येथे मंदिर प्रवेश आंदोलन त्यांनी उभे करून पांडुरंगाचे दार सर्वांसाठी खुले केले.
 साने गुरुजी म्हणजे प्रेम आणि तळमळ याचे मूर्तिमंत उदाहरण होय. एखादी कृती करण्यासाठी प्रेम ज्ञान आणि शक्ती यांची आवश्यकता आहे व त्यासाठी उपासना केली पाहिजे असे त्यांनी मुद्दाम प्रकर्षाने प्रतिपादन केले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी विपुल लेखन केले या लेखनामध्ये लहान मुलांपासून थोरांपर्यंत आणि स्त्री-पुरुष तसेच विद्वज्जन अभ्यासू व्यक्ती यांना उपयोगी पडेल असे साहित्य त्यांनी निर्माण केले. भारतीय संस्कृती, पत्री काव्य, सुंदर पत्रे तसेच इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी चोखाळले. त्यांच्या या कार्याबद्दल आपण कितीही ऋण मानावेत तेवढे कमीच होतील.
 सेवा दलाची स्थापना तसेच साधना साप्ताहिक ही त्यांची जणू अपत्य आहेत. त्यांच्या स्वप्नातील भारत घडणे अजूनही बाकी आहे. तो जेव्हा उदयास येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने गुरुजींचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणता येईल.

*"खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे."*

साने गुरुजी जयंती

 पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त या थोर महात्म्यास विनम्र अभिवादन!!!

मला भावलेले गुरुजी....



"साने गुरुजी" म्हटलं की एक असा चेहरा समोर येतो की ज्याच्याकडे पाहून आपोआप आपण नतमस्तक होतो आणि या व्यक्तीकडे पाहून नकळत मनामध्ये वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा या भावना दाटून येतात. का बरे असे होत असेल? समजत नाही, परंतु जेव्हा जेव्हा गुरुजींनी लिहिलेले साहित्य मी वाचतो, त्या त्या वेळी प्रयत्न करूनही डोळ्यातून ओघळणारे अश्रू आवरता येत नाहीत. त्यांचे साहित्य मला रडवते असं नाही. त्यातील जी भावना आहे, त्यातील जे प्रेम आहे, जे संस्कार आहेत ते जणू माझ्या मनाला शुद्ध करण्याचे काम करतात.

 अशावेळी गुरुजींच्या बद्दल त्यांच्या निकटवर्तीयांनी जे लिहिले आहे, ते वाचण्याचा मोह मला टाळता नाही. ते जिवंत अनुभव किती रोमांचकारी आहेत हे वाचल्याशिवाय कळणार नाहीत. गुरुजींना कधी कुणी प्रेमाने भेट दिलेली कपडे असोत अथवा काही वस्तू असोत वाटेत कोणी गरजवंत भेटला की गुरुजी त्याला ती वस्तू देऊन टाकत. एकदा पायातील चपला सुद्धा त्यांनी रस्त्याने अनवाणी चालणाऱ्या गृहस्थाला देऊन टाकल्या होत्या.

यामागे काय प्रेरणा होती बरे?

प्रेरणा होती. ती म्हणजे त्यांच्या आईची शिकवण! लहानपणी त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर केलेले संस्कार ते कधीही विसरले नाहीत आणि केवळ विसरलेच नाहीत तर त्याप्रमाणेच आयुष्यभर वागले. 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या गीतांमधून संपूर्ण मानव जातीला एक नवा धर्म त्यांनी सांगितला. कोणतेही प्रश्न कितीही मोठे युद्ध झाले तरी सुटणार नाही. पण ते जटिल प्रश्न प्रेमाच्या वार्तालापाने नक्कीच सुटतील यावर त्यांचा विश्वास होता. आणि आपण पाहतो आजवर अनेक युद्ध झाली पण प्रश्न हे जसेच्या तसेच आहेत. 

गुरुजींच्या या कनवाळू स्वभावाला लहानपणी त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव हे सुद्धा तितकेच कारणीभूत आहेत. आपल्या बालपणी त्यांना भेटलेल्या व्यक्ती आणि अनुभव यांनी त्यांचे भावविश्व समृद्ध केले.

सतत कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आणि प्रत्येक कामात मागे असलेली प्रामाणिक तळमळ ही सुद्धा अतिशय महत्त्वाची वाटते. गुरुजींनी शिक्षक म्हणून काम करताना त्या सहा वर्षांच्या कालावधीत शिक्षक कसा असावा याचे थोर उदाहरण घालून दिलं. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतल्यानंतर नेतृत्व आणि वक्तृत्व कसं असावं याचंही उदाहरण समोर ठेवलं.

 असं म्हणतात की ज्या वेळेस गुरुजी व्यासपीठावरून बोलत असत तेव्हा समोर बसलेला श्रोतृवर्ग आणि तरुण भारावून जात आणि देश कार्यामध्ये सर्वस्व त्याग करून सहभागी होत आणि सभा संपल्यानंतर जेव्हा एखाद्या ठिकाणी गुरुजी बसत असत त्यावेळेस त्यांना पाहून कुणालाही असं वाटत नसे हाच तो माणूस की ज्याने हजारो तरुणांना लढण्याची स्फूर्ती दिली.

असा निरंकारी आणि सर्वकाही अर्पण करूनही मी काहीच केले नाही असा स्वभाव असणारे गुरुजी अतिशय भिडस्त होते इतरांशी बोलताना खूप कमी बोलत असत परंतु काम करण्यासाठी मात्र ते सतत पुढे असत कोणतेही काम असो गुरुजींना ते करण्यामध्ये आनंदच वाटत असेल अगदी काँग्रेसचे पहिलं फैजपूर येथील ग्रामीण अधिवेशन असो त्यामध्ये गुरुजींनी तन मन धन अर्पून काम केले. अधिवेशनाला आलेल्या कार्यकर्त्यांच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याचे काम त्यांनी स्वतःकडे घेतले होते. खरेतर त्यांना या अधिवेशनात स्टेजवर बसण्याची विनंती केली परंतु त्यांनी नम्रपणे त्यास नकार दिला आणि परिसर साफ ठेवण्यासाठी त्यांनी नेतृत्व केले.

 याच प्रमाणे पुण्याचे रामभाऊ वडके एक प्रसंग सांगतात की काही कामानिमित्त ते मुंबईला गेले असताना सर्व कार्यकर्ते भूमिगत होते आणि या भूमीगत कार्यकर्त्यांना निरोप देण्यासाठी रामभाऊ गेले तेव्हा त्यांना जेवण्याचा आग्रह करण्यात आला. तेथे पंचा नेसून स्वयंपाक करणारे गृहस्थ त्यांनी पाहिले पण त्यांनी त्याला ओळखले नाही जेवण झाल्यानंतर वसंत बापट म्हणाले, अरे काही पान बिन आहे की नाही? आणि पुन्हा सगळे गप्पामध्ये रंगून गेले. त्यावेळेस तो पंचाधारी  गृहस्थ खाली गेला. रामभाऊ यांनी त्यापूर्वी गुरुजींना फक्त एकदाच पहिले होते तेही धोतर, कुर्ता, टोपी या वेषात. जेव्हा पंचाधारी गृहस्थ खाली जाऊन पान घेऊन आले तेव्हा रामाभाऊंच्या लक्षात आले की ते गुरुजी आहेत. तेंव्हा त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली गुरुजींनी आपल्यासाठी तीन जिने उतरून पान आणले ही घटना त्यांना असह्य झाली. त्यांनी क्षमायाचना केली. परंतु गुरुजींनी त्यांची समजूत काढली. अरे जेवणानंतर मी तुझ्यासाठी पान आणले म्हणून काय झालं? या घटनेचे त्यांना काहीच वाटले नाही. परंतु त्यानंतर कित्येक वर्ष रामभाऊंच्या मनावर ही घटना खोलवर रुजली होती. किती मृदू मुलायम मनाचा हा थोर सेनानी होता. हे अशा प्रसंगातून सहज आपणास दिसून येते.

धन्यवाद.



Friday 26 April 2019

सानेगुरूजी कथाकथन प्रबोधिनी पुणे

अखिल भारतीय साने गुरूजी कथाकथन प्रबोधिनी तर्फे
महाराष्ट्र , गोवा राज्यात शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी वक्तृव आणि भाषण - कथन या गुणांच्या वाढीसाठी शिबिरे घेण्यात येतात.

Tuesday 6 September 2016

कथाकथनाचा उगम

एक होता राजा . त्याचे राज्य सर्वदूर पसरले होते. राज्यात सर्वत्र भरभराट होती. कुणाला कशाचीही कमतरता नव्हती.
राजा प्रजेची पितृप्रेमाने काळजी घ्यायचा. प्रजाजन भरभरून आशीर्वाद देत.
राजाची पत्नीही सुस्वरूप व सुस्वभावी होती. जणूकाही प्रजेची आईच. राजाराणीला एकुलते एक पुत्ररत्नही होते.
एवढे सर्व चांगले असूनही राजाराणी मात्र दुःखी होते. काय बरे कारण होते त्यांच्या दुःखाचे?
त्यांचा एकुलता एक राजपुत्र आंधळा होता. ठार  आंधळा.
अनेक वैद्य उपचार करण्यासाठी येऊन गेले पण सर्वांनी  हात टेकले. राजपुत्राच्या काळजीने राजाराणी पार हताश झाले होते.
त्यांची ती अवस्था कोणालाही पाहवत नसे.सर्व मंत्री सतत चांगल्या वैद्याच्या शोधात असत.
एके दिवशी त्या राज्यात एक विद्वान महात्मा अवतरले. प्रधानजींना ही बातमी समजली. प्रधानजी तात्काळ त्या महात्म्यास  भेटावयास निघाले...

नमस्कार,
मित्रांनो कथेची एवढीशी सुरूवात वाचताच आपल्या मनात कितीतरी विचारचक्रे फिरू लागतात.
राजाराणीविषयी सहानुभुती निर्माण होते. प्रजेची निष्ठा समजते आणि संपूर्ण गोष्ट वाचण्याची आस लागते.
म्हणूनच कथाप्रकार जगात सर्वत्र प्रसिद्ध पावला आहे .
यया कथांचा कोठे केव्हा झाला असेल बरं?
घेऊया आपण शोध.
खरेतर जेव्हा दोन व्यक्ती समोरासमोर तेव्हापासूनच कथाकथनास सुरूवात झाली असे म्हणता येईल .
ते कसे ते पुढील पोस्ट मध्ये वाचू.
धन्यवाद.