मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र गाणारे पूज्य साने गुरुजी यांनी आपल्या बालपणी मिळालेला संस्कारांचा ठेवा आजही आपल्यासाठी "श्यामची आई" या पुस्तकात जपून ठेवून आपल्यासाठी वाटप केला आहे. त्यांच्या या पुस्तकातून प्रत्येक मानवाला जगण्याची प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे बालकांना संस्कारमय जीवन जगण्याची ऊर्मी येते.
पुण्यात एकदा साने गुरुजींची सभा होती सभेला अनेक कार्यकर्ते जमले होते.सभा ऐकण्यासाठी श्रोतृवर्ग व्याकुळ झाला होता. गुरुजी आपल्या घरापासून सभेला जाण्यासाठी निघाले. जाताना वाटेत काही मुले भेटली. भेटलेल्या मुलांनी गुरुजींना गोष्ट सांगण्याचा आग्रह केला. त्यांचा हात धरून ही छोटी छोटी बालके गोष्ट ऐकण्यासाठी त्यांना विनवणी करत होती. गुरुजींना त्यांची विनंती टाळून पुढे जाणे अशक्य झाले. शेजारीच गणपतीचे मंदिर होते या मंदिरात मुलांनी गोष्ट ऐकण्यासाठी बैठक मांडली. गुरुजींनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. गोष्ट ऐकताना व्यत्यय येऊ नये, म्हणून एक मुलगा मंदिराच्या घंटे जवळ उभा राहिला आणि येणाऱ्या भाविकांना नमस्कार करून विनंती करायचा की कृपया घंटा वाजू नका. गोष्ट रंगू लागली. इकडे सभेला उशीर होत होता. कार्यकर्ते त्यांची वाट पाहत होते. एक कार्यकर्ता त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला. वाटेत त्याने पाहिलं की गुरुजी मंदिरात मुलांना गोष्ट सांगत आहेत. तो तेथे जाऊन थांबला आणि ती गोष्ट ऐकण्यात तोही गुंग होऊन गेला. बराच वेळ झाला नंतर गुरुजींच्या लक्षात आलं की आपल्याला सभेला जायला उशीर होतो. त्यांनी गोष्ट आवरती घेऊन सभेकडे प्रस्थान केले. असे होते साने गुरुजी.
मुलांच्या आनंदात आनंद मानणारे साने गुरुजी म्हणजे मातृहृदय आणि पितृहृदय यांचा संगम असलेले व्यक्तिमत्व होते. मातेच्या हळुवारपणे त्यांनी आपल्या निकटतम सहकाऱ्यांना बोध अमृत पाजले. तर पित्याच्या कठोर वाणीने परकीयांशी झुंज दिली. शिक्षकी पेशा सोडून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्व झोकून दिले. जवळपास सात वर्ष वेगवेगळ्या कालावधीमध्ये तुरुंगवास सोसला. आपल्या लेखणीने समाजाला ज्ञानामृत पाजले अश्रु केवळ दुःख करण्यासाठी नाहीत तर हृदय स्वच्छ ठेवण्यासाठी असतात, हे त्यांनी दाखवून दिले. केवळ स्वातंत्र्याचा लढा नव्हे तर शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते दीनदलितांना त्यांचा लाडका विठुराया भेटावा यासाठी पंढरपूर येथे मंदिर प्रवेश आंदोलन त्यांनी उभे करून पांडुरंगाचे दार सर्वांसाठी खुले केले.
साने गुरुजी म्हणजे प्रेम आणि तळमळ याचे मूर्तिमंत उदाहरण होय. एखादी कृती करण्यासाठी प्रेम ज्ञान आणि शक्ती यांची आवश्यकता आहे व त्यासाठी उपासना केली पाहिजे असे त्यांनी मुद्दाम प्रकर्षाने प्रतिपादन केले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी विपुल लेखन केले या लेखनामध्ये लहान मुलांपासून थोरांपर्यंत आणि स्त्री-पुरुष तसेच विद्वज्जन अभ्यासू व्यक्ती यांना उपयोगी पडेल असे साहित्य त्यांनी निर्माण केले. भारतीय संस्कृती, पत्री काव्य, सुंदर पत्रे तसेच इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी चोखाळले. त्यांच्या या कार्याबद्दल आपण कितीही ऋण मानावेत तेवढे कमीच होतील.
सेवा दलाची स्थापना तसेच साधना साप्ताहिक ही त्यांची जणू अपत्य आहेत. त्यांच्या स्वप्नातील भारत घडणे अजूनही बाकी आहे. तो जेव्हा उदयास येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने गुरुजींचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणता येईल.
*"खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे."*

No comments:
Post a Comment